महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ फक्त पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होता. राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना शासनाने या योजनेत समाविष्ट केल्याने राज्यातील २२ लाख ४२ हजार ३१८ पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे.
पांढऱ्या रेशनकार्डधारक कुटुंबांना प्रत्येक वर्षी ५ लाखांपर्यंत आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे.
यापूर्वी फक्त पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना हि योजना होती. या योजनेअंतर्गत १ हजार ३५६ उपचार मोफत करण्यात येतात. राज्यातील सर्वच रेशनकार्डधारकांचा या योजनेत समावेश करावा अशी मागणी केली जात होती. २८ जुलै २०२३ रोजी याबाबत शासनाने निर्णय घेऊन पांढऱ्या कार्डधारकांना दिलासा दिला आहे.
३२८ मागणी असलेल्या नवीन उपचारांचा योजनेत समावेश केला आहे. तसेच मागणी नसलेले १८१ उपचार वगळले आहेत.
प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख इतके संरक्षण करण्यात आले आहे. पुर्वी ते आरोग्य संरक्षण प्रति वर्ष १.५ लाख इतके होते. मुत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी असलेली २.५ लाखांची मर्यादा वाढवून ४.५ लाखांची केली आहे.
शासनाने हा निर्णय घेतला असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. विमा कंपनीशी करार आरोग्य हमी सोसायटी रचना या गोष्टींची तयारी शासकीय पातळीवर सुरू आहे.