(चालू घडामोडी) Current Affairs | 1 November 2019

मराठमोळे सतिश खंदारे लडाखचे पहिले पोलीस महासंचालक :

 • जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. केंद्रशासित प्रदेश म्हणून गुरुवारपासून (३१ ऑक्टोबर) अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरले आहेत. ते ११९५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
 • सतिश खंदारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यत जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.
 • २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून खंदारे यांनी कार्यभार सांभाळला.

देशात आता २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासीत प्रदेश :

 • तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर देशात २९ राज्ये आणि सात केंद्रशासीत प्रदेश अस्तित्वात होते. जम्मू आणि काश्मीर हा प्रदेशाचा राज्याचा दर्जा गुरुवारपासून रद्द झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधीत केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती केली.
 • हे दोन्ही केंद्रशासीत प्रदेश अस्तित्वात आले. केंद्रातील सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू आणि निवृत्त सनदी अधिकारी राधाकृष्ण माथूर यांनी अनुक्रमे जम्मू आणि काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासीत प्रदेशांचे नायब राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला.
 • वळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांची केंद्राने गोव्याच्या राज्यपालपदी बदली केली. राज्यपाल पदाच्या तुलनेत नायब राज्यपालपद हे तुलनेत कमी महत्त्वाचे पद मानले जाते. यामुळेच मलिक यांना बदलण्यात आले.

लवकरच धावणार देशातील पहिली ‘वॉटर मेट्रो’ :

 • लवकरच देशातील पहिली वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. सर्वकाही नियोजित राहिल्यास केरळमधील कोची शहरात नोव्हेंबर 2020 मध्ये ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही देशातील पहिली ‘वॉटर मेट्रो’ ठरेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरण विषयक मंजुरी देखील मिळाली आहे. ही वॉटर मेट्रो 15 मार्गांवर चालेल आणि याद्वारे कोचीच्या आजुबाजूला असलेल्या 10 बेटांशी संपर्क होऊ शकेल. 78 किमीचा प्रवास ही वॉटर मेट्रो करेल.
 • ‘कोची मेट्रो रेल लिमिटेड’कडे(केएमआरएल) या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी असून यामुळे बेटांवरील एक लाखांहून अधिक नागरिकांना फायदा होईल.
 • “नोव्हेंबर 2020 पर्यंत जास्तीत जास्त टर्मिनल पूर्ण करण्याची आमची योजना आहे. कोचीन शिपयार्डने नोव्हेंबर 2020 पर्यंत वॉटर मेट्रोची पहिली बोट सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. एकदा हा वॉटर मेट्रोचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट जलवाहतूक प्रकल्प ठरेल, असं केएमआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अलकेश कुमार शर्मा म्हणालेत.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची दुसरी सभा नवी दिल्लीत पार पडली :

 • 30 आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची दुसरी सभा भरविण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले.
 • भारताचे अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग आणि फ्रान्सचे ब्रूने पिर्सन कार्यक्रमाचे सह-अध्यक्ष होते. सभेला 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झालेत. ही सभा ‘ISA’ची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे आणि विविध प्रशासकीय, आर्थिक आणि कार्यक्रमांशी संबंधित मुद्द्यांविषयी मार्गदर्शन पुरविते.
 • आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA): पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्यास मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here