(चालू घडामोडी) Current Affairs | 10 December 2019

मिस युनिव्हर्स 2019: झोजिबिनी टुंझी (दक्षिण आफ्रिका)

 • दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स 2019’ म्हणजेच विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे. मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय क्रमांक तर मिस मेक्सिकोने तृतीय क्रमांक पटकावले.
 • अमेरिकेच्या अॅटलांटा शहरात 9 डिसेंबर 2019 रोजी 68 वी ‘मिस युनिव्हर्स’ ही सौंदर्य स्पर्धा झाली. गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने मानाचा मुकूट विजेतीला चढविला.
 • उपांत्य फेरीत पोहचलेली भारताची वर्तिका सिंग शेवटच्या 20 जणींमध्ये होती. मात्र अंतिम 10 जणींमध्ये तिला स्थान मिळवता आले नाही.
 • स्पर्धेविषयी: मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात मुख्यालय असलेली मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ह्या स्पर्धेचे आयोजन करते. 1952 साली कॅलिफोर्नियामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली होती.
 • विश्वसुंदरी ठरलेल्या भारतीय – सुष्मिता सेन (सन 1994) व लारा दत्ता (सन 2000)

सॅना मरिन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

 • 34 वर्षीय सॅना मरिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा बहुमान पटकवणार आहेत. मरिन येत्या आठवड्यात फिनलंड या उत्तर युरोपियन देशाच्या पंतप्रधानपदाची शपथग्रहण करतील.
 • फिनलंडमध्ये पाच घटकपक्षांनी युती करत सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे पाचपैकी चार पक्षांची धुरा महिलांच्या खांद्यावर आहे. या चौघीही 34 वर्षांखालील आहेत.
 • युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक हे 35 वर्षांचे, तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न या 39 वर्षांच्या आहेत. आतापर्यंत होनारुक हे सर्वात तरुण पंतप्रधान, तर आर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान होत्या. दोघंही पदावर असतानाच, दोघांचाही विक्रम मोडत मरिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान (साहजिकच सर्वात तरुण महिला पंतप्रधानही) ठरल्या आहेत.

फुटबॉल : महिलांना सलग तिसरे सुवर्णपदक

 • भारताच्या महिला फुटबॉल संघाने सोमवारी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग तिसऱ्या सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीत यजमान नेपाळला २-० असे पराभूत करून भारताने विजेतेपद मिळवले.
 • बाला देवीने दोन गोल नोंदवून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. २९ वर्षीय बालाने स्पर्धेत सर्वाधिक पाच गोल झळकावले. त्याशिवाय गोलरक्षक आदिती चौहाननेसुद्धा संपूर्ण स्पर्धेत एकही गोल न स्वीकारता भारतासाठी बहुमूल्य योगदान दिले.

नागरिकत्व विधेयक लोकसभेत मंजूर

 • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.
 • हे विधेयक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्य समाजासंबंधी आहे. पाकिस्तानमध्ये मुस्लिम अल्पसंख्य नाहीत. म्यानमार हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून तेथील रोहिंग्या बांगलादेशातून येतात. त्यांना कधीही निर्वासित म्हणून स्वीकारले जाणार नाही. मतांच्या राजकारणासाठी घुसखोरांना शरण देण्याच्या कृतीला या विधेयकामुळे आळा बसेल, असे शहा म्हणाले.
 • संविधानातील अनुच्छेद १४ मध्ये समाविष्ट असलेल्या समान हक्कांचे या दुरुस्ती विधेयकामुळे उल्लंघन होत नाही. त्यामुळे हे विधेयक संसदेत मांडणे अवैध ठरत नाही, असे स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिले.
 • १९५९ मध्ये नेहरू-लियाकत यांच्यातील करारनुसार, त्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण होणे अपेक्षित होते. पाकिस्तान तसेच बांगलादेशात कराराची अंमलबजावणी झाली नाही. शेजारी देशांतील अल्पसंख्य समाजावर धर्माच्या आधारावर अत्याचार झाले. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली नसती या देशातील अल्पसंख्य व्यक्तींना नागरिकत्व देण्याची गरज पडली नसती, असे शहा म्हणाले.
 • हे दुरुस्ती विधेयक संविधानातील अनुच्छेद १४ मधील समानतेच्या तत्त्वाच्या संविधानातील मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करते, असा मुद्दा उपस्थित करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. लोकसभेत सकाळी हे विधेयक मांडण्यासाठी झालेली चर्चा देखील वादळी ठरली. त्यामुळे विधेयक पटलावर मांडण्याच्या अनुमतीसाठी मतदान घ्यावे लागले.
 • २९३ विरुद्ध ८२ मतांनी विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. लोकसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष यांच्यासह केरळ, आसाममधील छोटे पक्ष, डावे पक्ष, एमआयएम आणि आययूएमएल आदी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here