(चालू घडामोडी) Current Affairs | 15 December 2019

ओडिशा राज्य सरकारने ‘वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2019’ हा पुरस्कार जिंकला

 • संयुक्त राष्ट्रसंघ-अधिवास (UN-Habitat) या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटनच्या वर्ल्ड हॅबिटॅट या संस्थेच्यावतीने ओडिशा राज्य सरकारला त्यांचा 2019 सालासाठीचा ‘वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.
 • हा पुरस्कार ओडिशा सरकारच्या “जगा मिशन” नावाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. राज्य सरकारने या उपक्रमाच्या माध्यमातून दरिद्री लोकांचे शहरी जीवनमान उंचावण्याचा मार्ग जगाला दाखविलेला आहे.
 • ओडिशा सरकारच्या “जगा मिशन” या पुढाकाराच्या अंतर्गत कायद्याद्वारे जमिनीचा हक्क देणे आणि झोपडपट्टी कमी करणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा दिसून आली आणि रोजगाराच्या संधींमध्ये देखील वाढ झालेली आहे.

RISAT-2BR1 मुळे भारताला काय फायदा होणार

 • या उपग्रहाचे काम सुरु झाल्यानंतर लगेचच आपल्याला आवश्यक फोटो मिळण्यास सुरुवात होईल.
 • या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. सैन्यदलांना रणनिती ठरवण्यात या उपग्रहाची मदत होईल.
 • शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
 • कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास RISAT-2BR1 सक्षम आहे.
 • त्याशिवाय शेती, जंगल आणि आपत्तीच्या काळातही या उपग्रहाची मदत मिळणार आहे.
 • मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर भारताने रिसॅट २ उपग्रह प्रक्षेपित केला होता.
 • पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडानखडा माहिती मिळू शकेल.
 • बालाकोट सारख्या मिशनची आखणी करण्यामध्ये भविष्यात रिसॅट-२बीआर१ खूप महत्वाचा ठरेल.

दिल्लीत आर्थिक जनगणनेस प्रारंभ

 • राजधानी दिल्लीत सातव्या आर्थिक जनगणनेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत “कॉमन सर्व्हिस सेंटर’ (सीएससी) या “एसपीव्ही’शी करार केला आहे.
 • प्रथमच संपूर्ण जनगणना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केली जात आहे; जी अचूकता व डेटा सुरक्षितता सुनिश्‍चित करेल. दिल्ली हे 26वे राज्य आहे, जेथे सर्वेक्षण सुरू केले गेले आहे, तर 20 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात प्रक्रिया सुरू आहे.

जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सितारामण यांच्या नावाचा समावेश

 • फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला आहे. या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.
 • यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा व बायोकॉनच्या संस्थापक किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.
 • फोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.
 • सीतारामन ३४ व्या क्रमांकावर असून त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.
 • मल्होत्रा या ५४ व्या क्रमांकावर असून त्या एचसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी ८.९ अब्ज डॉलर्सची आहे. मजुमदार शॉ या ६५ व्या क्रमांकावर असून त्या स्वयंश्रीमंत महिलांमध्ये आघाडीवर आहेत. बायोकॉन या कंपनीची स्थापना त्यांनी १९७८ मध्ये केली होती. त्यांनी संशोधन व पायाभूत व्यवस्थेत गुंतवणूक केली आहे.
 • फोर्ब्सच्या या यादीत गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेटस, आयबीएमच्या गिनी रोमेटी, फेसबुकच्या शेरील सँडबर्ग, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अरडर्न, इव्हान्का ट्रम्प, गायक रिहान व बियॉन्स तसेच टेलर स्विफ्ट, टेनिस पटू सेरेना विल्यम्स, हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here