(चालू घडामोडी) Current Affairs | 27 January 2020

जयपुर साहित्य महोत्सव 2020

 • राजस्थानच्या जयपूर या शहरात 13 वा ‘जयपूर साहित्य महोत्सव’ चालू आहे. हा जयपूरमध्ये होणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे महोत्सवाचे उद्घाटन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते झाले.
 • “लर्निंग ईच अदर्स स्टोरीज” या विषयाखाली हा कार्यक्रम 24 जानेवारी ते 28 जानेवारी 2020 या कालावधीत ‘डिग्गी राजवाडा’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
 • कार्यक्रमादरम्यान विविष पुरस्कारांचे वाटप करण्यात आले तसेच पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. ग्राफिक डिझायनर असलेल्या स्नेहा पामनेजा ह्यांना ‘ऑक्सफोर्ड बुकस्टोअर बुक कव्हर’ पुरस्कार देण्यात आला. काव्यासाठी अरविंद कृष्ण मेहरोत्रा ह्यांना ‘महाकवी कन्हैयालाल सेठिया पुरस्कार’ देण्यात आला.

Padma Awards : ‘सुपरमॉम’चा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान, पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण

 • सहावेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मेरी कोमचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पूरस्कारांची घोषणा केली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. मेरी कोमव्यतिरीक्त भारताची आघाडीची महिला बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
 • २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूनेही २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी सिंधू एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने आतापर्यंत १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकं मिळवली आहे.
 • मेरी कोमव्यतिरीक्त क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, माजी हॉकीपटू एम.पी.गणेश, नेमबाजपटू जितू राय, भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार ओनिअम बेंबम देवी, तिरंदाज तरुणदीप राय यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

भारत-ब्राझील यांच्यात १५ करार

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष जेअर मेस्सिया बोलसोनारो यांच्यामध्ये शनिवारी सामरिक मुद्द्यांबरोबरच द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांमध्ये १५ करारांवर सह्या करण्यात आल्या.
 • प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलसोनारो भारत दौऱ्यावर आले आहेत.
 • दोन्ही देशांमध्ये झालेल्या १५ करारांमध्ये संरक्षण, सुरक्षा, व्यापार, शेती, नागरी हवाई वाहतूक, ऊर्जा, पर्यावरण, आरोग्य यांबरोबरच आंतराष्ट्रीय दहशतवादाविरोधातील कारवाईविषयीच्या करारांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे, या चर्चेमध्ये व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांवरच भर देण्यात आला.
 • ‘बोलसोनारो यांच्या भेटीने भारत-ब्राझील यांच्या संबंधांतील नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे,’ असे सांगतानाच भारताच्या आर्थिक विकासामध्ये ब्राझील हा मौल्यवान भागीदार असल्याचेही मोदी यांनी सांगितले. या वेळी संरक्षण उद्योगांमधील सहकार्य वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर

 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून या मानकऱ्यांमध्ये सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • सुरेश वाडकर यांनी मराठी आणि हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांची कोंकणी आणि भोजपुरी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत. ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, सीने में जलन आखों में तुफाँ सा क्यु हैं, सुरमयी अखियों में, ऐ जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले असे अनेक सुमधूर गाणी गायली आहेत.
 • राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील त्यांची गाणी गाजली. त्याच प्रमाणे प्रेमरोग चित्रपटातील ‘भंवरेने खिलाया फूल’, ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’ ही गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.

जेटली, स्वराज, फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण :

 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी केंद्र सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे नागरी पुरस्कार जाहीर केले.
 • पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला, तर माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला.
 • तसेच महाराष्ट्रातील 13 मान्यवरांना नागरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण, तर पोपटराव पवार, बीजमाता राहिबाई पोपेरे आणि मुस्लीम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यदभाई यांच्यासह 12 जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत.
 • तर एकूण 141 जणांना नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यांत सात जणांना पद्मविभूषण, 16 जणांना पद्मभूषण आणि 118 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले.
 • पुरस्कार विजेत्यांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. तर 18 मान्यवर परदेशी किंवा अनिवासी भारतीय आहेत. त्याचबरोबर 12 मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here