(चालू घडामोडी) Current Affairs | 8 January 2020

कर्नाटकाच्या छल्लाकेरे येथे अंतराळवीरांसाठी ISROचे प्रशिक्षण केंद्र उभारणार

 • अंतराळवीरांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या हेतूने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक राज्यातल्या छल्लाकेरे या गावाजवळ जागतिक दर्जाची सुविधा देणार एक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.
 • कर्नाटकातल्या चित्रदुर्गा जिल्ह्यात बेंगळुरू-पुणे NH4 वरील छल्लाकेरे या गावाजवळ हे केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
 • ISROने या प्रकल्पासाठी 2,700 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार केला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच तेथे ‘योंग ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ देखील तयार केले जाणार.
 • सध्या, गगनयान अभियानासाठी भारतीय अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

‘नसीम-अल-बहर’: भारत आणि ओमान यांचा द्विपक्षीय सागरी सराव

 • रॉयल नेव्ही ऑफ ओमान आणि भारतीय नौदल यांच्यादरम्यान ‘नसीम-अल-बहर’ नावाचा द्विपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी या कार्यक्रमाची ही 12 वी आवृत्ती आहे.
 • या सरावात भाग घेण्यासाठी ओमानच्या नौदलाची RNOV खसाब आणि RNOV अल रसीख ही दोन जहाजे 5 जानेवारी 2020 रोजी गोव्याच्या मोरमुगाव बंदरात दाखल झाली.
 • हा सागरी सराव 1993 सालापासून आयोजित केला जात आहे. ओमान हा देश होरमुजची सामुद्रधुनी याच्या प्रवेशद्वारावर असून त्याद्वारे भारत आपल्या आयातीतील एक पंचमांश तेल आयात करतो.

नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

 • नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत हा किताब पटकावला आहे. हर्षवर्धनचा विजय होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला.
 • यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पैलवान पुण्याच्या काका पवारांच्या तालमितील आहेत.
 • पुण्याच्या बालेवाडीत ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. कालच्या सामन्यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यामुळे आज नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळकेमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

भारतीय वंशाच्या दोन महिला अमेरिकेत न्यायाधीश :

 • न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासिनो यांनी भारतीय वंशाच्या दोन महिलांची फौजदारी आणि दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
 • न्यायाधीश अर्चना राव यांना फौजदारी न्यायालयात आणि न्यायाधीश दीपा अंबेकर यांना दिवाणी न्यायालयात नियुक्त करण्यात आले आहे.
 • तर राव यांना यापूर्वी जानेवारी 2019 मध्ये दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. न्यूयॉर्क काऊंटी जिल्हा अ‍ॅटर्नी कार्यालयात त्या 17 वर्षांपासून सेवा देत आहेत.
 • अंबेकर यांना मे 2018 मध्ये दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. महापौरांनी कौटुंबिक न्यायालय, फौजदारी न्यायालय, दिवाणी न्यायालयात 28 नियुक्त्या केल्या आहेत.

पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांना ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान :

 • किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकारातून विविध पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्याने आयोजित 14 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांना ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला.
 • अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते डॉ. देब यांना पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन या सन्मानाने गौरविण्यात आले.
 • तर यावेळी एन्ड्रीएस एवल्स दिग्दर्शित ‘द पायथन कोड’ हा समारोपाचा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच या महोत्सवानिमित्त आयोजित किर्लोस्कर जी.सी.सी. ट्रॉफी, पथनाट्य स्पर्धा, प्रश्न मंजूषा स्पर्धा, रामनदी फोटो वॉक आणि रामनदी युवा संसद अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here