(चालू घडामोडी) Current Affairs | 9 December 2019

भारताकडून फिलीपाईन्स देशाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री

 • ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री करण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र विकत घेणारा फिलीपाईन्स हा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्‍चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यंत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
 • ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. एका इंग्रजी वर्तमापत्राच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
 • वेगवेगळ्या चाचण्यानंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्‍चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला 10 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.

कॅप्टन कोहलीने ट्वेंटी-20त नोंदवला विश्वविक्रम :

 • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. वेस्ट इंडिजनं संघात एक बदल करताना दिनेश रामदिनच्या जागी निकोलस पूरणला पाचारण केले. पण, विराटनं संघात बदल नसल्याचं जाहीर केले. या सामन्यात विराटनं 19 धावा करताच विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्यानं हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला.
 • तर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संयमी सुरुवात केली. पण, चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खॅरी पिएरे यानं लोकेश राहुलला माघारी पाठवलं. राहुल 11 धावा करून शिमरोन हेटमायरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराटनं एक चतुर खेळी केली.
 • स्वतः फलंदाजीला न येता विराटनं डावखुऱ्या शिवम दुबेला फलंदाजीला पाठवले. पण, दोन्ही खेळाडूंना मोठे फटके मारताना अडचण जाणवत होती. टीम इंडियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या.
 • तसेच विराट 19 धावांवर माघारी परतला, पण तो ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं 74 सामन्यांत 2563 धावा केल्या आहेत. तर रोहित 103 सामन्यांत 2562 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न

 • नवी दिल्लीत 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात ‘व्हॅल्यूइंग वॉटर – ट्रान्सफॉर्मिंग गंगा’ या विषयाखाली चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते झाले.
 • IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे जल शक्ती मंत्रालय आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 • कार्यक्रमातल्या ठळक बाबी: पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
 • कार्यक्रमादरम्यान, ‘रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन – ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड’ यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या ‘गंगा हब’ यांचा हवाला जाहीर करण्यात आला.
 • बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.

शत्रूवर प्रहार करण्यासाठी ‘तेजस’ होणार अधिक शक्तीशाली, बनवणार Mk-2 व्हर्जन

 • तेजस (एमके-२) या फायटर विमानाच्या व्यावसायिक उत्पादनाला पुढच्यावर्षी फेब्रुवारी २०२० पासून सुरुवात होणार आहे. एॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश एस देवधरे यांनी ही माहिती दिली. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे.
 • तेजसचे एमके २ व्हर्जन शक्तीशाली रडारसह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज असणार आहे. या फायटर जेटच्या एव्हिऑनिक्स सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली असून ते दृष्टीपलीकडच्या लक्ष्यावर प्रहार करण्यास सक्षम असेल. Mk-1 आणि Mk-1A पेक्षा तेजस Mk-2 ची इंधन टाकी मोठी असून त्यावरुन जास्त शस्त्रास्त्रे वाहून नेता येतील. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
 • इंडियन एअर फोर्स तेजस Mk-1 आणि Mk-2 व्हर्जनची १२३ विमाने विकत घेणार आहे. जुन्या झालेल्या फायटर विमानांच्या जागी स्वदेशी बनावटीची विमाने विकत घेणार असल्याचे आएएफकडून सरकारला सांगण्यात आले आहे. फ्रेंच बनावटीची मिराज-२००० आणि रशियन मेड मिग-२९ फायटर विमानांची जागा घेण्यासाठी तेजस Mk-2 ची निर्मिती करण्यात येणार आहे. बालाकोट एअर स्ट्राइकसाठी आयएएफने मिराज-२००० विमानांचा वापर केला होता. नियोजित कार्यक्रमानुसार तेजस Mk-2 चे पहिले उड्डाण २०२४ मध्ये अपेक्षित आहे.

शिक्षणतज्ज्ञ सुरेश आमोणकर यांचे निधन :

 • कोकणी लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ व गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे अल्प आजाराने रविवारी पणजी येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
 • शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने 2009 साली आमोणकर यांना पद्मश्री किताबाने सन्मानित केले होते.
 • तर शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक व भाषा चळवळीतील अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमोणकर यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात चार वेळा कर्करोगाशी यशस्वी लढा दिला होता.
 • तसेच ‘धम्मपद’ या बौद्धांच्या धर्मग्रंथाचा कोकणीत अनुवाद करण्यासाठी ते पाली भाषा शिकले होते.
 • ज्ञानश्वरी, भगवद्गीता, ‘गॉस्पेल ऑफ जॉन’ या महत्त्वाच्या धार्मिक पुस्तकांचे त्यांनी कोकणीत प्रवाही अनुवाद केले. अलीकडेच त्यांनी शेक्सपियरच्या ‘ज्युलियस सीझर’ या नाटकाचा कोकणीत अनुवाद केला होता. शेक्सपियरच्या विविध नाटकांमधील प्रसिद्ध संवाद व म्हणी यांचे संकलन असलेल्या कोकणीतील अनुवादित पुस्तकाचेही त्यांनी प्रकाशन केले होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here