एमपीएससी – कृषी सेवा परीक्षा : सामान्य अध्ययन (राजकीय यंत्रणा आणि भूगोल)

या लेखामध्ये भारतीय राजकीय यंत्रणा आणि भूगोल या घटकांची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

भारतीय राजकीय यंत्रणा

 • यामध्ये प्रत्यक्ष प्रशासन व शासन धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा व त्यासंबंधी विविध घटकांचा समावेश होतो. केंद्र व राज्य पातळीवरील प्रशासनामध्ये कायदेमंडळे आणि प्रशासकीय कार्यपद्धतींचा समावेश होतो.
 • संसद आणि विधानमंडळांची रचना, कार्यकाळ, पदाधिकारी, सदस्य संख्या, निवडणूक, लोकप्रतिनिधित्व कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, मंत्रिमंडळविषयक तरतुदी या बाबी बारकाईने अभ्यासाव्यात.
 • संसद आणि विधानमंडळांचे कामकाज, त्यांच्या समित्या, रचना, काय्रे, अधिकार, कायदा निर्मिती प्रक्रिया, अर्थसंकल्पविषयक कामकाज यांच्या बाबत घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यासाठी त्यांची कामकाज नियमावली पाहणे आवश्यक आहे.
 • राष्ट्रपती व राज्यपालांचे अधिकार, काय्रे, नेमणूक याबाबतच्या तरतुदी समजून घ्याव्यात.
 • स्थानिक प्रशासनामध्ये ७३वी व ७४वी घटनादुरुस्त्यांमधील तरतुदी, त्या अन्वये स्थापन केलेल्या समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सोपवलेले विषय हे मुद्दे समजून घ्यावेत.
 •  ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत अशा उतरंडीचा कोष्टक पद्धतीत अभ्यास करता येईल. यामध्ये पुन्हा महसुली व विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे. अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्यायला हव्यात. विशेषत: तलाठी आणि पोलीसपाटील या पदांबाबत अभ्यासक्रमामध्ये वेगळा उल्लेख असल्याने सांगोपांग अभ्यास करायला हवा. या संपूर्ण घटाकाबाबत चालू घडामोडींची माहिती असायला हवी.
 • स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, त्यांच्या निवडणुकांबाबतच्या तरतुदी, कार्यकाळ, विसर्जति करण्याचे अधिकार, राज्य निवडणूक आयोग, त्याची रचना, काय्रे व अधिकार यांचा आढमवा घ्यावा.
 • शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्यांचे प्रकार, निवडणूक, रचना, काय्रे, अधिकार इ. बाबी व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करावा.

भारताचा भूगोल

 • महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा भूगोल अभ्यासायचा आहे. प्रश्नांचे स्वरूप पाहता पूर्णपणे तथ्यात्मक आणि बहुविधानी संकल्पनात्मक असे वैविध्य दिसते. त्यामुळे मूलभूत आणि नकाशावर आधारित असा अभ्यास आवश्यक आहे.
 • देशाच्या व महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्टय़े, हवामानाचे वैशिष्टय़पूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आíथक उत्पादनांमध्ये या वैशिष्टय़ांचे योगदन या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक  यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.
 • नदी आणि पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आíथक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या प्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. यामध्ये महाराष्ट्रातील नदी – पर्वतांचा अभ्यास बारकाईने करणे आवश्यक आहे तर भारतातील प्रणालींमध्ये ठळक प्रणालींचा आढावा घ्यावा.
 • महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आíथक महत्व समजून घ्यावे. देशातील वनक्षेत्रांपकी ठळक महत्त्वाच्या क्षेत्रांचा आढावा घ्यावा.
 • महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.
 • भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आíथक महत्त्व या मुद्यांच्या अनुषंगाने अभ्यासावेत.
 • प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्य़ांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आíथक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांची कोष्टकामध्ये टिप्पणे काढावी.
 • राज्यातील जिल्ह्य़ांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्य़ांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नसíगक भूरूपे या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळ्याने नमूद केलेल्या नसल्या तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.
 • भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंग गुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी. सन २००१ व २०११मधील जनसंख्या किंवा संबंधित आयामांमध्ये झालेले बदल यांचा तुलनात्मक अभ्यास कोष्टकामध्ये टिप्पणी काढल्यास चांगल्या प्रकारे  होईल.

Cr. फारुक नाईकवाडे

वरील सर्व माहिती/लेख दै. लोकसत्ता मधून घेतला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here