एमपीएससी पूर्वपरीक्षा: राज्यघटना भाग २

राज्यघटनेतील सर्वच घटकांवर कमी अधिक प्रमाणात प्रश्न विचारले जातात. या घटकांवर सर्वसाधारणपणे दहा ते बारा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आयोगाची राज्यघटनेवरील प्रश्न विचारण्याची वृत्ती विधानात्मक किंवा विश्लेषणात्मक स्वरूपाची आहे.

राज्यघटनेतील सर्वच घटकांवर कमी अधिक प्रमाणात प्रश्न विचारले जातात. या घटकांवर सर्वसाधारणपणे दहा ते बारा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आयोगाची राज्यघटनेवरील प्रश्न विचारण्याची वृत्ती विधानात्मक किंवा विश्लेषणात्मक स्वरूपाची आहे. यामुळे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करून विषय अभ्यासावा. हा विषय समजून अभ्यासल्यास या विषयांत जास्तीत जास्त गुण मिळवता येतील.

भारतीय राज्यघटनेत मुळात १२ परिशिष्ट २२ भाग आणि यातील ३२५ कलमांचा समावेश करण्यात आला होता. सद्यस्थितीत घटनेत १२ परिशिष्ट, २५ भाग आणि यातील ४६१ कलमांचा समावेश आहे. राज्यघटना अभ्यासताना परिशिष्ट किंवा भागांना अनुसरून अभ्यास केल्यास कलमे किंवा त्यातील तरतुदी, माहिती लक्षात ठेवायला सोपी जाते.

अभ्यास करताना भारतीय राज्यघटनेचे वेगळेपण काय किंवा प्रमुख वैशिष्ट्ये काय हे लक्षात घ्यावे. जसे की, आपली राज्यघटना जगातील सर्वांत विस्तृत स्वरूपाची लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना अशामुळे विस्तृत स्वरूपाची बनलेली आहे, कारण अनेक देशांच्या घटनांचा बदल करून घेतलेला भाग, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वपूर्ण कायद्यांच्या तरतुदी, राज्यव्यवस्थेसाठी लागणाऱ्या प्रशासकीय तरतुदींचा सविस्तरपणे करण्यात आलेला अंतर्भाव यामुळे राज्यघटनेचे स्वरूप विस्तृत बनलेले आहे. आपली राज्यघटना किंचित ताठर व किंचित लवचिक आहे. म्हणजेच गरज असल्यास घटनात्मक पद्धतीने घटनेत दुरुस्ती करता येते. त्यामुळे राज्य घटनेच्या निर्मितीपासून आजतागायत यात १०१ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.
राज्यघटनेचा स्रोत भारतीय जनता आहे, असे राज्यघटनेच्या सरनाम्यावरून दिसून येते. म्हणजेच भारतीय नागरिक राज्यघटनेच्या केंद्रस्थानी आहेत. भारतीय नागरिक म्हणजे कोण, राज्यघटनेतील नागरिकांची व्याख्या, तरतुदी, अटी, शर्ती अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे मूलभूत हक्क, मूलभूत हक्कांचे संरक्षण इत्यादी. तसेच नागरिकांसाठी लागणाऱ्या सोयी, सुविधा उपलब्ध करणे, समाजातील दुर्बल घटकांना न्याय, आर्थिक व सामाजिक विषमता कमी करण्यासाठी राज्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या तत्त्वांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच घटनेच्या सरनाम्यात नमूद केलेल्या तत्त्वांचा विस्तार होय.

लोकशाहीत लोकांना आपल्या कर्तव्यांचे भान असणेसुद्धा आवश्यक असते म्हणून ४२ व्या घटना दुरुस्तीने कलम ५१(अ) नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत. अभ्यास करताना वरील उल्लेखलेले मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये तसेच मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वांवरील न्यायालयीन वाद, त्यावरील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे विशेष करून अभ्यासावे लागतात. राज्यव्यवस्था चालविण्यासाठी लागणारी कार्यकारी व्यवस्था म्हणजे राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा सभापती, राज्यसभा सभापती, मंत्रिमंडळ यांचे कार्य, शपथ, नियुक्ती, कार्यकाळ, अधिकार, कर्तव्य, बडतर्फी आदी बाबींचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. तसे कायदेमंडळ केंद्र व राज्य, संसद सदस्य, कार्यपद्धती, त्यातील प्रश्नोत्तराचे तास, तारांकित प्रश्न, अविश्वास ठराव, कायदे करण्यासाठी लागणाऱ्या तरतुदी आदींचा अभ्यास करावा लागतो.
भारतीय न्यायव्यवस्था तिच्यातील न्यायव्यवस्थेचा क्रम, न्यायाधीशांच्या नियुक्ती, अटी-शर्ती, कार्यकाल आदी तसेच अलीकडील काळात न्यायमंडळांचा वाढलेली न्यायालयीन सक्रियता, त्या आधारे होणारे प्रमुख न्यायालयीन निर्णय, त्यांचा चालू घडामोडींशी असणारा संदर्भ अभ्यासणेही महत्त्वाचे आहे. इतर प्रमुख संविधानात्मक संस्था, निवडणूक आयोग, वित्त आयोग, यूपीएससी, एमपीएससी, कॅग यांच्याविषयीच्या तरतुदी, या संस्थांच्या अध्यक्ष, सदस्य, त्यांची नेमणूक, कार्यकाळ, पात्रता, अटी व शर्ती यावर आयोगाने हमखास प्रश्न विचारलेले दिसतात. घटनादुरुस्तीविषयी तरतुदी, त्याच्या घटनादुरुस्तीच्या पद्धती तसेच प्रमुख घटनादुरुस्ती जसे ४२वी, ४४वी, ५१वी, ६१वी, ७३वी, ७४वी, ८६वी. या घटनादुरुस्तींवर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीतील राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पाया आहे. या घटकालासुद्धा महत्त्वपूर्ण स्थान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, त्याची अंमलबजावणी, पंचायतराज, नागरी स्थानिक संस्था, त्याची रचना, त्रिस्तरीय किंवा द्विस्तरीय स्तर, या संदर्भातील राष्ट्रीय समिती, राज्यस्तरीय समिती, त्यांच्या शिफारशी या बाबींचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी, पदाधिकारी, निवड, नियुक्ती, कार्यकाळ, आरक्षण, बडतर्फी आदी बाबी विशेषकरून अभ्यासाव्या लागतात.

राज्यव्यवस्था व शासन म्हणजेच परीक्षेतील अभ्यासाच्या दृष्टीने राज्यघटना या पूर्वपरीक्षेच्या घटकासाठी चांगल्या दर्जाचे साहित्य किंवा संदर्भपुस्तके मराठी व इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्यामुळे या विषयाचा अभ्यास समजावून व विश्लेषणात्मक केल्यास जास्तीत जास्त गुण मिळण्याची हमी आहे.

  • संदर्भसाहित्य- मराठीतून- भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया-तुकाराम जाधव, खंड १ (युनिक प्रकाशन)
  • इंग्रजीतून- Indian Polity- By M. Laxmikant
  • Introduction of – Indian Constitution – By D. D. Basu
  • Our Constitution – By Subhash Kashyap

अमित संतोषराव डहाणे
वरील सर्व माहिती/लेख दै. महाराष्ट्र टाइम्स मधून घेतला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here